नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा झटका आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांसोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणले होते. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरू होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. कधीही निकाल येणे अपेक्षित होते.
“लोकशाहीचा हा विजय आहे. हा घटनेचा विजय आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे. त्यांचा संकल्प आणि विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं. मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिली. ठाकरे गटाचे नेते तथा मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी यावेळी शिंदे गटासह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. याशिवाय पुढील काळात न्यायालयात या निर्णयावर आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले.