नागपूर : उपराजधानी आणि संघ मुख्यालयाचे स्थान असलेल्या नागपुरात आल्यानंतरही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वसंयेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट होऊ शकणार नाही. डॉ. भागवत १६ फेब्रुवारीलाच बरेली दौऱ्यावर गेल्याने संघभूमित भागवत-शहा यांची भेट हुकणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे १७ फेब्रुवारीला नागपुरात आगमन होणार आहे. दोन दिवस ते नागपुरात राहणार आहे. संघाच्या कार्यालयाला 2018 नंतर ते पहिल्यांदाच भेट देणार आहेत. मात्र त्यावेळी आरएसएस प्रमुख नागपुरात नसतील. शहा रेशीमबागेतील हेडगेवार स्मारकाला भेट देणार असल्याचा उल्लेख त्यांच्या अधिकृत दौऱ्यात आहे. पण,अमित शहा येण्याच्या एक दिवस आधीच डॉ. भागवत बरेली दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. त्यामुळे संघ मुख्यालयात शहा जाण्याचा आता प्रश्नच उरलेला नाही.
शहा नागपुरात येणार असल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात दणक्यात स्वागत होणार आहे. अमित शहांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांना सायंकाळी 7 वाजताच विमानतळावर बोलावण्यात आले आहे. शहा 18 रोजी सकाळी 10.30 वाजता दीक्षाभूमीला भेट देऊन आदरांजली वाहतील. त्यानंतर 11.00 वाजता रेशिमबाग येथे जाऊन डॉ. हेडगेवार स्मृतिस्थळ व गोळवलकर गुरूजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर एका स्थानिक कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.