मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत नवीन नियम २०२५ पासून लागू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा मांडला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन नियम २०२५ पासून लागू करण्याच्या निर्णयाला तत्वत: मान्यता प्रदान केली.
परीक्षांमध्ये नवीन नियम लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. यासंदर्भात आंदोलनही उभारण्यात आले होते. २०२३ ऐवजी २०२५ पासून नवीन नियम लागू करण्यात यावेत, अशी मागणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार आता एमपीएससीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर वर्णनात्मक पॅटर्न लागू करण्यात येणार आहे.
मंगळवार, ३१ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर सर्वच मंत्र्यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देत २०२५ पासून नवीन नियम लागू करण्याची विनंती केली. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला तत्त्वत: मान्यता दिल्याचे सांगितले. राज्य सरकार एमपीएससीला विनंती करेल तसेच यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.