अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एक संशयित व्यक्तीकडून ५० लाखांवर रोकड जप्त केली. मात्र तपासदरम्यान रक्कमचा खरा मालक निष्पन्न झाला असून ती रक्कम त्याला सुपूर्द करण्यात आली आहे. अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये व्यापक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिस बंदोबस्त आणि गस्तीदरम्यान रविवार, २९ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी पोलिसांना ५० लाख रुपयांची रोकड जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अकोट शहर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्या जवळुन ५० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या व्यक्तीला अकोट पोलिस ठाण्यात आणत चौकशीला सुरुवात करण्यात आली. चौकशीदरम्यान ही रोकड ५० लाख ९० हजार रुपये असल्याचे पुढे आले. चौकशी सुरू असताना या रोकडचा खरा मालक पोलिसांपुढे हजर झाला. त्याने रोख रकमेबाबत कागदपत्र सादर केल्यानंतर ही रक्कम पोलिसांनी खऱ्या मालकाच्या स्वाधीन केली. ही रोकड अकोल्यावरून राजस्थानला जात होती. ही रोकड राजस्थान येथून अकोला जिल्ह्यातील विविध भागात चादर ब्लॅकेट्स विकण्यासाठी आलेल्या लोकांची असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अकोला जिल्ह्यात प्रक्रिया सुरू आहे. कदाचित मतदानासाठीच ही रक्कम वापरली जात असावी असा संशय होता. यासाठी ही रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर रोकड घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची कसून चौकशी केल्यानंतर वस्तुस्थिती समोर आल्याची माहिती अकोट शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली. कागदपत्राची तपासणी केल्यानंतर पूर्ण रक्कम संबधित व्यापाऱ्याला सुपूर्द केली, असेही अहीरेंनी सांगितले.