Home » बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री म्हणतात, संत तुकारामांना पत्नी मारहाण करायची

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री म्हणतात, संत तुकारामांना पत्नी मारहाण करायची

by नवस्वराज
0 comment

रायपूर : पत्नी संत तुकाराम महाराजांना मारहाण करायची. त्यामुळेच ते ईश्वराच्या सान्निध्यात लागले असे वादग्रस्त विधान केले आहे, बागेश्वर धाम सरकारचे आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी. यासंदर्भात त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील विधानावर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही आक्षेप घेतला आहे.

“संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय…”, असे आचार्य शास्त्री यांनी आपल्या कथेदरम्यान म्हटले. धीरेंद्र महाराजांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर वारकरी संप्रदायाने यावर आक्षेप घेतला आहे.

बाबांच्या या वक्तच्याचा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध व्यक्त केला आहे. बागेश्वर धाम यांनी जगतगुरु तुकारामाबद्दल बोलताना चुकीचा संदर्भ दिला आहे. त्यातून संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नीच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे, असे भोसले म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध केला. बागेश्वर बाबांनी संत तुकाराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले असेल, तर ते दाखवणे बंद करा. संत तुकारामांविषयी कुणी काही वादग्रस्त बोलले असेल, तर त्याचा जाहीर निषेध केलाच पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

नागपुरातील रामकथेदरम्यान अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानामुळे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री अधिक चर्चेत आलेत. तत्पूर्वीपासून त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाले होते, ज्यात ते न सांगता समोर असलेल्या व्यक्तीच्या मनातील ओळखत असल्याचे दिसते. बागेश्वर बाबांनी आपले दावे आमच्यासमोर सिद्ध केल्यास त्यांना 30 लाखाचे बक्षीस दिले जाईल, असे आव्हानच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी दिले आहे. नाशिकच्या आध्यात्मिक प्रतिष्ठाने महर्षी साधुंसह अनेक संतांनी बाबांची बाजू घेतली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!