नवी दिल्ली : बागेश्वर धाम सरकार येथील मठाधिपती धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशात त्यांना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनीही आव्हान दिले आहे. छत्तीसगड येथील विलासपूरमध्ये त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे नाव न घेता ते म्हणाले, ‘जोशीमठमध्ये त्यांनी चमत्कार दाखवावा. हे भूस्खलन त्यांनी थांबवून दाखवावं.. तरच मी त्यांना मानेन… वेदांनुसार चमत्कार दाखवणाऱ्यांनाच मी मानतो’, असा दावा अविमुक्तेश्वरानंद यांनी केला आहे. फक्त आपली स्तुती आणि चमत्कारी बाबा म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्यांना मी मानत नाही, असे वक्तव्य शंकराचार्य यांनी केले आहे.
जोशीमठ हे उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. डेहराडून पासून २९५ किलोमीटर अंतरावर असलेले जोशीमठ हे बद्रिनाथचे प्रवेशद्वार आहे. हिमालय पर्वतरांगांमध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होण्यास सुरुवात झाली आहे. २०२३च्या सुरुवातीपासूनच संपूर्ण गावाचे स्थलांतर करण्यात आले आहे. आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांपैकी एक जोशीमठ अथर्ववेदासाठी महत्वपूर्ण मानला जातो. येथील भूस्खलन थांबवण्याचे आव्हान शंकराचार्य यांनी दिले आहे.