नागपूर : केंद्रामध्ये चांगलेच वजन असलेले भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कर्नाटकातून जीवे मारण्याची धमकी आली आहे. कर्नाटकातील हुबळी येथुन एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा धमकीचे कॉल आल्याने. नागपुरात एटीएसने तातडीने तपास सुरू केला आहे.
नितीन गडकरी यांचे खामला चौकातील ऑरेंज सिटी हॉस्पिटल समोर जनसंपर्क कार्यालय आहे. सध्या गडकरी नागपुरातच मुक्कामी असून शनिवार 14 जानेवारी 2023 रोजी या कार्यालयात कर्नाटकातील हुबळी येथुन तीन वेळा कॉल आला. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास दोन कॉल तर दुपारी बारा वाजता पुन्हा तिसरा कॉल आला. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मान्यता येईल असे कॉल करणाऱ्यानी सांगितले. कॉल करणाऱ्याने गडकरी यांनी१०० कोटींची खंडणी द्यावी असे सांगितले.
गडकरी यांना ही धमकी देताना कुख्यात गॅंगस्टर दाऊद इब्राहिम च्या नावाचा वापर करण्यात आला आहे. या घटनेची माहिती गडकरी यांच्या कार्यालयातून नागपूर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर नागपूर शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अधिकारी व दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात दाखल झालेत. त्यानंतर पोलिसांनी कॉल ट्रेसिंगला सुरुवात केली. तपासानंतर कॉल कुठुन आला, याचा शोध लागला. पोलिसांनी या घटनेची माहिती कर्नाटक पोलिसांना दिली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलीस एकत्रितपणे कॉल करणाऱ्याचा शोध घेत आहेत. कॉल आला त्यावेळी गडकरी नागपूरच मुक्कामी असल्याने त्यांची व्यक्तिगत सुरक्षा वाढविण्यात आली आहे. याशिवाय गडकरी यांचे वर्धा मार्गावरील निवासस्थान, खामला परिसरातील जनसंपर्क कार्यालय येथील सशस्त्र सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.