गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गट्टा ते गट्टागुडा मार्गावर पुलाच्या बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याने त्या भागात दहशतीचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. काही काळ शांत असलेल्या नक्षलवाद्यांनी दक्षिण गडचिरोली भागात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गुरुवारी भामरागड तालुक्यातील तुमरकोठी येथील गाव पाटलाची हत्या केल्याची घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यात जाळपोळ केली.
गट्टा ते गट्टागुडा मार्गावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी असलेल्या वाहनांची नक्षल्यांनी रात्री १०च्या सुमारास जाळपोळ केली. यात मिक्सर मशीनचा समावेश आहे, तर काही वाहनांची तोडफोड केली. हा परिसर अतिसंवेदनशील आहे. गेल्या वर्षभरापासून नक्षलवाद्यांच्या कारवाया कमी झाल्या होत्या. परंतु महिनाभरापासून नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाले आहेत.
जहाल नक्षलीस अटक
भामरागड मधील धोडराज हद्दीतील मौजा नेलगुंडा गावात जहाल नक्षली वत्ते ऊर्फ प्रदीप वंजा वड्डे (वय 40 वर्षे, रा. नेलगुंडा तह. भामरागड जि. गडचिरोली) याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली. वड्डे हा त्याच्या स्वत:च्या गावात लपून बसलेला आहे. या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाचे जवान अभियान करीता असताना त्याला ताब्यात घेतले. वड्डे 1997 मध्ये नक्षलमध्ये भरती झाला. सध्या तो भामरागड दलममध्ये सदस्य या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर 03 पोलीस खुनासहीत 8 खुन, 3 चकमक, 1 दरोडा व इतर 1 असे एकुण 13 गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.