अकोला : अकोल्यातील 25 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रातील 600 मिलीमिटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरूच आहे. रविवारी रात्री पर्यंत काम पूर्ण झाल्यास मंगळवारी तसेच काम पूर्ण न झाल्यास बुधवारी शहरातील आठ जलकुंभाचा पाणी पुरवठा पूर्वपदावर येईल. काही भागातील पाणीपुरवठा रविवारी सुरू झाला.
19 डिसेंबर रोजी अशोक वाटिका चौकात उड्डाण पुलाच्या लँडिंग खालून गेलेली 600 मिलीमिटर व्यासाची जलवाहिनी फुटली. यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील 25 एमएलडीवरील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. या जलवाहिनीवरुन शहरातील आठ जलकुंभांना पाणीपुरवठा केला जातो. लॅडींग खाली जलवाहिनी फुटल्याने दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे महापालिकेने 30 मिटर लांबीची जलवाहिनी बदलण्याचा निर्णय घेतला. सध्या हे काम सुरू असल्याने पाणी पुरवठा बंद आहे. रविवारपर्यंत काम पूर्ण झाल्यास मंगळवारी पाणी पुरवठा सुरू होईल अन्यथा बुधवारनंतर अकोल्यातील पाणी पुरवठा सुरळीत होईल.