नागपूर : नागपूरचे दिव्यांग उद्योजक जयसिंग चव्हाण यांना केंद्र सरकारच्या सामाजिक आणि न्याय विभागाकडून देशातील सर्वश्रेष्ठ दिव्यांग हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ३ डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे.
पुरस्काराबद्दल चव्हाण म्हणाले, लहानपणी पोलिओची चुकीची लस दिली गेल्यामुळे व चुकीच्या वैद्यकीय उपचारामुळे नशिबी शाररिक दिव्यांगत्व आले. मात्र त्याचा बाऊ न करता त्यांनी प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केले आहे. दोन्ही पाय निकामी झाल्यावर सुरुवातीला त्यांनी घरोघरी जाऊन साबण विकण्याचे काम सुरू केले. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले जयसिंग हे नागपुरातील एका छोट्याशा चाळीत राहायचे. शारीरिक कमकुवततेमुळे ते इतरत्र जात नव्हते. हळुहळू त्यांनी मनाशी निश्चय करत वयाच्या १८ व्या वर्षी आपणही काम करू शकतो. या उर्मीतून व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी साबण विकायला सुरूवात केली.
येथुन सुरू झालेला त्यांचा प्रवास आज कोट्यवधी उलाढाल असलेला उद्योग म्हणून नावारूपाला आला आहे. आज त्यांची गणना नागपुरातील यशस्वी उद्योजक म्हणून केली जाते. दिव्यांगांना मिळणाऱ्या सायकलचा वापर करत ते घरोघरी जाऊन व्यवसाय करू लागले. परंतु, किती दिवस घरोघरी जाऊन व्यवसाय करायचा. या प्रश्नातून त्यांनी वाट काढत स्वतःचा व्यवसाय सुरू केला. छोटेखानी उद्योगाला सुरुवात केली. शारीरिक शक्ती नसतानाही डोक्याचा वापर करत उद्योगाला उभारी देण्याचे काम चव्हाण यांनी केले. त्यानंतर स्वतःकडे लक्ष देत त्यांनी हात आणि डोक्याच्या व्याधीवर मात करत पहिला विजय मिळविला.
२०१० मध्ये त्यांच्या कंपनीला आग लागली. त्यात सर्व जळाले. जयसिंग यांना निराशा वाटू लागली. परंतु आगीनंतर सकारात्मकेची धग स्वतःत निर्माण करत त्यांनी घरच्यांच्या मदतीने पुन्हा व्यवसायाला सुरूवात केली. नंतर व्यवसाय उभारी घेऊ लागला. आज जयसिंग यांच्याकडे विविध उद्योग आहेत. ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. तसेच साबणाचा कारखाना, बुटीबोरी एमआयडीसी येथे ऑइल रिफायनरी फॅक्टरी, रेस्टॉरंटला वस्तू पुरवठा, स्मॉल स्केल इंडस्ट्रियल सप्लाय हेही व्यवसाय ते करतात. दिव्यांगांनी फक्त शासनाच्या योजनेवर अवलंबून न राहता. आपल्या कर्तृत्वशक्ती चालना देऊन स्वतःला घडवावे असे मत त्यांनी व्यक्त केले.