नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आठवड्याभरात त्यासंदर्भात जाहिरात काढली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, वर्षभरात महाराष्ट्रात ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याची योजना राबविली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून १८ हजार पोलिसांच्या भरतीची जाहिरातही येत्या आठवड्याभरात काढली जाईल. मुख्यमंत्र्यांनी इतर विभागांनाही निर्देश दिले आहेत. सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणावर तरुणाईला नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जाणार आहे. आरोग्य विभागातील १० हजार १२७ जागांसाठी भरती प्रक्रियेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.