अकोला : रेल्वे स्टेशन मार्गापासून सुरू होणारा उड्डाणपूल, टावरकडून गांधी मार्गाकडे जाणारा भुयारीमार्ग अकोलेकरांना वहातुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे काही अंशी रहदारीचा भार हलका झाला आहे. दिवसा शहर वाहतूक पोलिसउड्डाणपुलावर रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतात. मात्र रात्री उशीरा काही मद्यपी उंचावर, खुल्या हवेत, निसर्गाच्या सान्निध्यात आपला शौक पूर्ण करतात.
दुचाकी, चारचाकी वाहने चालवण्याचे प्रशिक्षण व कसरतीसाठी देखील पुलाचा वापर करण्यात येतो. जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर असलेल्या शासकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे खेळ देखील रात्रीसच चालतात. भुयारीमार्गात त्याभागातील काही असामाजिक तत्व रात्री धुडगूस घालतात. त्यामुळे अनेकदा किरकोळ अपघात घडले आहेत. वहातुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासनाने या मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.