नागपूर : शिवसेनेची स्थापना झाल्यापासून ठाकरे परिवाराला तब्बल 37 वर्षांनी पुन्हा एकदा मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना राजकारणात ही मशाल लाभी ठरली. महापालिका, विधानसभा आणि लोकसभेत याच मशालीने शिवसेनेला प्रवेश मिळवून दिला. आता हिच मशाल उद्धव ठाकरे यांच्या हाती आली आहे.
यापूर्वी 1985 मध्ये शिवसेनेने याच मशालला निवडणूक चिन्ह बनविले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आली होती. याच मशालीने शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील विजयाचा क्रम सुरू केला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबबळावर निवडणूक लढाविण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेची पाहिले निवडणूक चिन्ह धगधगती मशाल हेच होते. याच चिन्हावर त्यावेळी शिवसेनेचे 74 नगरसेवक विजयी झाले होते. मुंबई महापालिकेतील हा विजय शिवसेनेसाठी ऐतिहासिक ठरला. मुंबई पालिकेतील या विजयामुळे महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलले व शिवसेना राजकारणाच्या केंद्रस्थानी आली.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार छगन भुजबळ शिवसेनेत असताना मशाल याच चिन्हावर निवडणूक लढले. याच मशालीवर विजयी होणारे शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून छगन भुजबळ यांनी 1985 मध्ये इतिहास रचला होता. त्यानंतर शिवसेनेची मशाल धगधगतीच राहिली. 1989 लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मोरेश्वर सावे यांनीही मशाल हेच चिन्ह घेतले होते. त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यांचाही विजय याच मशालीने करून दिला.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ज्योतिष्य अभ्यासकांनीही काही भाकीत वर्तविले आहेत. आपली सध्याची प्रतिमा पुसण्यात ठाकरे यशस्वी ठरतील असे मत व्यक्त होत आहे. 2024 पर्यंत उद्धव जोमाने काम करतील व त्यांना त्यात यश मिळेल, असे त्यांच्या कुंडलीचा अभ्यास केल्यानंतर ज्योतिष्य अभ्यासकांचे मत आहे. अशात त्यांना मिळालेले मशाल हे निवडणूक चिन्ह बाळासाहेब ठाकरेंना जसे लाभी ठरले तसे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना लाभी ठरेल का, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.