नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधान विरोधी काम करीत असल्याचा आरोप करत भारत मुक्ती मोर्चा संघटनेचे प्रमुख वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. संपूर्ण इंदोरा भागात कलम 144 लागू करीत पोलिसांनी मेश्राम व त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले आहे.
संघटनेचे प्रमुख वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात बेझनबाग ते संघ मुख्यालय असा मोर्चा काढण्यात येणार होता. त्यानंतर आंदोलक संघ मुख्यालयाला घेराव घालणार होते. नागपूर शहर पोलिसांनी आंदोलकांना परवानगी नाकारल्याने आंदोलक न्यायालयात गेले होते. न्यायालयाने देखील भारत मुक्ती मोर्चा संघटनेला आंदोलन किंवा मोर्चा काढण्याची परवानगी नाकारत सहा ते नऊ ऑक्टोबर दरम्यान पोलिसांकडे परवानगीकरिता अर्ज करावा, असे निर्देश दिले होते. तरी देखील वामन मेश्राम आणि त्यांची संघटना मोर्चा काढण्यावर ठाम होते. त्यामुळे आज नागपूर शहरातील संपूर्ण इंदोरा भागात कलम 144 लागू करण्यात आला.
शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनासह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू असल्याने पोलिसांनी भारत मुक्ती मोर्चा संघटनेला आंदोलनाची परवानगी नाकारली होती. त्याचबरोबर न्यायालयाने देखील वामन मेश्राम यांची याचिका फेटाळून लावत सहा ते नऊ ऑक्टोबर दरम्यान पोलिसांकडे अर्ज करून कार्यक्रम आयोजित करावा असे निर्देश दिले होते. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने नागपूर शहर पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दिवसभरात आणखी आंदोलक ताब्यात घेतले जाणार आहेत.
पोलीस विभागाने आणि न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर देखील सोशल मीडियाच्या पोस्ट वरून मोर्चेकऱ्यांना संघ मुख्यालयाजवळ बोलाविण्यात येत होते. संघ मुख्यालयाचा परिसर हाय सिक्युरीटी झोन असल्याने वेळीच कारवाई करणे आवश्यक होते, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. पोलिसांनी आधी भारत मुक्ती मोर्चाशी चर्चा केली. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बेझनबाग आणि इंदोरा परिसरात 144 कलम लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. प्रक्षोभक भाषण करून नागरिकांना भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा ईशाराही पोलिसांनी दिला आहे.