अकोला : बाळापूर येथील शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्याविरूद्ध अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्याने तक्रार दाखल केली तो अकोल्यातील सराईत गुन्हेगार असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.
आमदार देशमुख यांच्याकडे कंपनी, कारखाने, शेतजमिन असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. करीता अकोल्यातील एका व्यक्तीने अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. आमदार देशमुख यांनी स्वत:च ही माहिती दिली. अमरावती एसीबीच्या काही लोकांनी बाळापूर परिसरात म्हणजेच आपल्या मतदारसंघात पाहणी केल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. एसीबीने देशमुख यांना अद्याप कोणतीही नोटीस बजावलेली नाही. मात्र आपल्याला एसीबी कार्यालयातून फोन आला होता. आपल्याविरोधात तक्रार झाली असून वरिष्ठांना जाऊन भेटा, प्रकरण मिटवून घ्या असा निरोप मिळाल्याचे देशमुख यांनी सांगितले. वर जाऊन म्हणजे नेमके कुणाला भेटावे, कोणाशी भेटावे, असाही प्रश्न आमदार नितीन देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देशमुख यांच्या विरोधात तक्रार झाल्याची बाब सत्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एसीबीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक देवीदास घेवारे यांनी ही चौकशी केल्याचे सांगण्यात आले. मात्र एसीबीचा अहवाल गोपनिय असल्याने त्यातील उल्लेख कळु शकला नाही.