मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान बुधवार, २४ ऑगस्ट २०२२ रोजी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सादर केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाचा आमदार अतुल भातखळकर यांनी दमदार समाचार घेतला.
विधान सभेत पवार भाषण करीत असताना भातखळकर बोलल्याने पवार त्यांच्यावर संतापले होते. ‘तुम्ही खुप ज्ञानी आहात. तुम्हाला सगळेच माहिती आहे, पण माझ्यामध्ये बोलू नका’, असे पवार म्हणाले. याचे सडेतोड प्रत्युत्तर भातखळकर यांनी आपल्या भाषणादरम्यान दिले. पवारांचे अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषण पूर्ण होताच विधान सभेच्या तालिकाध्यक्षांनी भातखळकर यांना बोलण्याची परवानगी दिली.
सभागृहात उभे राहताच आमदार भातखळकर यांनी तुफान फटकेबाजी सुरू केली. अंतिम आठवडा प्रस्तावात ‘औरंगाबाद’ असा शब्द पकडत त्यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले. शिवसेना सत्तेसाठी कशी लाचार झाली होती, हे त्यांनी स्पष्ट केले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक, पोलिस निरीक्षक सचिन वाझे, एसआरए, म्हाडा, सिंचन घोटाळ्याची एसीबी चौकशी याचा उल्लेख केला. पेट्रोल व डिझेलच्या वाढीचा मुद्दा त्यांनी आपल्या २५ मिनिटांच्या भाषणादरम्यान उपस्थित केला. अजित पवार हे अर्थमंत्री असताना त्यांनी व्हॅट कमी करणार नाही असे ठामपणे सांगितले होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हॅट कमी केला. त्यामुळे पवारांचे भाषण नेमके कुणी लिहिले आहे, असा प्रश्नही भातखळकर यांनी उपस्थित केला.