Home » आमदार मिटकरी, शिंदेंचे एकमेकांवर आरोप; आपसांत भिडले

आमदार मिटकरी, शिंदेंचे एकमेकांवर आरोप; आपसांत भिडले

by नवस्वराज
0 comment

मुंबई : विधान भवनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये त्यावेळी तणाव निर्माण झाला ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात शिविगाळ व नंतर मारामारी झाली. या घटनेमुळे विधिमंडळात खळबळ उडाली.

विधान भवनाच्या पायऱ्यांवर बुधवार, २४ ऑगस्ट २०२२ रोजी आमदारांचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी आमदार महेश शिंदे व आमदार अमोल मिटकरी आमने-सामने आलेत. काही वेळातच ते आपसांत भिडले. आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक आमदारांनी मिटकरी व शिंदे यांना बाजूला केले. बराच वेळपर्यंत हा वाद सुरू होता.

या घटनेनंतर आमदार शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अमोल मिटकरी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा डाग असल्याची जळजळीत टीका शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केली. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने अमोल मिटकरी यांचे वर्तन पाहिले आहे. त्यांनी धक्काबुक्की केल्यानंतर पुढील सगळ्या गोष्टी घडल्या. अमोल मिटकरी हे जहाल विचारांचे आहेत, लोकशाही विचार त्यांना मान्य नाहीत, अशी टीका महेश शिंदे यांनी केली. आपण या सगळ्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे करणार असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.

आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना विरोधकांनी त्याठिकाणी येणे चुकीचे होते. त्यांचे आंदोलन सुरू असताना आम्ही तिथून शांतपणे निघून जातो. गेल्या अडीच वर्षांत अर्थ खाते यांनी धुतले. सगळे पैसे बारामतीला गेले. ही गोष्ट बाहेर येईल, या भीतीने अमोल मिटकरी यांच्याकडून आंदोलनात खोडा घालण्यात आला, असे शिंदे म्हणाले.

आंदोलन करण्यासाठी आम्हीही विधान भवनाच्या पायऱ्यांवर जमलो होतो. आंदोलन शांतपणे सुरू होते. अशात शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी धक्काबुक्की सुरू केल्याचा प्रत्यारोप आमदार मिटकरी यांनी केला. धक्काबुक्की करणाऱ्या आमदारासह अनेकांनी अश्लिल शिविगाळ केल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी व विरोधकांमध्ये झालेला हा संघर्ष आता विधिमंडळाच्या सभागृहातही पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!