गोंदिया : गोंदिया शहरालगत रेल्वे अपघात घडल्याने खळबळ उडाली आहे. रायपुरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या भगत की कोठी जवळ प्रवासी गाडी मालगाडीला पाठीमागून धडकली. या अपघातात 50 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला.
जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवार, 17 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे चार वाजता हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे आपत्कालीन मदत पथक नागपूरहून भगत की कोठीकडे रवाना झाले. पथकाने जखमी प्रवाशांना तातडीने इस्पितळाकडे रवाना केले. त्यानंतर रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याचे काम हाती घेण्यात आले. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही भगत की कोठीच्या दिशेने रवाना झाले आहेत. अपघात नेमका कशामुळे घडला, याचा तपास करण्यात येत आहे.