भंडारा-गोंदियातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी साकोली, भंडारा येथे आंबेडकर जयंतीच्या दिवशी सभा घेतली. सभेत त्यांनी भाजपाच्या जाहीरनाम्यातील आश्वासने सांगितली. काँग्रेसवर टीका करताना अमित शाह म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती करून देशाला एकसंघ ठेवण्याचे काम केले. त्यांनीच या देशाला विश्वातील सर्वात चांगले संविधान दिले. काँग्रेस पक्ष आज घरोघरी जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मते मागत आहे. पण याच काँग्रेसने आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत करण्याचे काम केले.” आरक्षणाच्या मुद्द्यावरही अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली.
“पाच दशक सत्ता असतानाही काँग्रेसने कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही. काँग्रेसने आंबेडकरांचा नेहमीच अपमान करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाने खोटं-नाटं बोलून त्यांच्या विचारधारेला मातीमोल केले. भाजपाला 400 हून अधिक जागा मिळाल्या तर भाजपा आरक्षण समाप्त करेल, असा अपप्रचार काँग्रेसकडून केला जातो.” असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले
आमच्याकडे दोनवेळा पूर्ण बहुमत असलेले सरकार आहे. पण आमच्या बहुमताचा उपयोग आरक्षण हटविण्यासाठी केला नाही, हे मी राहुल गांधी यांना सांगू इच्छितो. बहुमताचा उपयोग आम्ही कलम 370 हटविण्यासाठी जरूर केला. आमच्या बहुमताचा उपयोग तिहेरी तलाक प्रथा रद्द करण्यासाठी केला. राहुल गांधींनी अपप्रचार करणे बंद करावे. मी आज याठिकाणाहून जाहीर करतो की, भाजपा आरक्षणाला धक्का लावणार नाही किंवा अन्य कुणालाही धक्का लावू देणार नाही. हे अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेना-राष्ट्रवादी आम्ही फोडली नाही
महाराष्ट्रात अर्धी उरलेली काँग्रेस पार्टी, एक नकली शिवसेना आणि एक नकली राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अशी टीका अमित शाह यांनी अलिकडे केली होती. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांकडून या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. भंडारा येथील सभेत अमित शाह यांनी पुन्हा एकदा याच टीकेचा पुनरच्चार केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आरोप करतात की, भाजपाने त्यांचा पक्ष फोडला. अमित शाह म्हणाले की, मी महाराष्ट्राला हे पुन्हा सांगू इच्छितो की, आम्ही त्यांचे पक्ष फोडलेले नाहीत. शरद पवारांच्या लेकीप्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि उद्धव ठाकरेंच्या पुत्रमोहामुळे शिवसेना पक्ष फुटला. तर दुसऱ्या बाजूला विदर्भाचा एक नेता काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाला. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीने पूर्ण असलेल्या काँग्रेसला अर्धे करण्याचे काम केले. असे अमित शाह यांनी सांगितले.