BJP News : काँग्रेस नेत्यांना कारल्याची उपमा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरपूर प्रहार केले. ‘कारले तुपात घोळा किंवा साखरेत, ते कडूचे कडूच’, असे मराठीतून म्हणत मोदींनी काँग्रेसवर सडेतोड टीका केली. सुधीर मुनगंटीवार, अशोक नेते यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
मोदींनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले, देशात पारा वाढत आहे आणि सत्तेच्या सारीपाटाचाही पारा चढत आहे. विदर्भाने ठरवले आहे की ‘फीर एक बार मोदी सरकार’. चंद्रपूरने अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी लाकूड पाठवले. नव्या भारताच्या संसदेच्या इमारतीमध्येही चंद्रपूरचेच लाकूड लागले आहे. चंद्रपूरची ख्याती देशभर पोहोचली आहे. त्यासाठी चंद्रपूरच्या लोकांना धन्यवाद. 2024 मधील लोकसभा निवडणूक स्थिरता विरुद्ध अस्थिरतेची निवडणूक आहे. एनडीएचे ध्येय देशासाठी कठोर आणि मोठे निर्णय घेणे, हे आहे. काँग्रेस इंडियाचा मंत्र ‘जेथेही सत्ता मिळेल, तेथे मलाई खायची’, हा आहे.
काँग्रेसने देशाला अस्थिर केले आहे. एक स्थिर सरकार किती आवश्यक आहे, हे महाराष्ट्रापेक्षा कोण जास्त समजू शकेल. अस्थिर सरकारमुळे महाराष्ट्राची उपेक्षाच झाली. राज्याच्या सत्तेतही त्यांनी स्वतःचा परिवाराचाच विकास केला. कुणाचा किती हिस्सा असेल, कोणता ठेका कुणाला मिळणार, हेच धंदे करून त्यांनी आजवर महाराष्ट्राचे अहित केले, असे म्हणत मोदींनी काँग्रेस नेत्यांवर भरपूर टीका केली.