Home » Supreme Court : प्रा. साईबाबा यांच्या सुटकेला स्थगितीस नकार

Supreme Court : प्रा. साईबाबा यांच्या सुटकेला स्थगितीस नकार

Naxal Connection : भूषण गवई, संदीप मेहता यांच्या खंडपीठाने दिला निर्णय

by नवस्वराज
0 comment

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माओवाद्यांचे म्होरक्या असल्याचा आरोप असलेले प्रा.जी.एन. साईबाबा आणि इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या या आदेशाला स्थगिती मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली.  सोमवारी (ता.11)  सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. उच्च न्यायालयाचा निर्णय हा तर्कसंगत असल्याचे मतही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.

माओवादी चळवळीशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा व त्याच्या साथीदारांची आजन्म कारावासासह इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली. कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. प्रा. साईबाबांसह इतर आरोपींवर युएपीएअंतर्गत गुन्हा दाखल केला गेला होता. या प्रकरणावर 5 मार्च रोजी न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायूर्ती वाल्मीकी मेंनझेस यांनी निर्णय दिला होता. यानंतर राज्य सरकारने उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात निर्दोष सुटकेला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यावर आता सर्वोच्च न्यायालयातही राज्य सरकारला फटका बसला आहे.

काय होता आरोप?

7 मार्च 2017 रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबासह महेश करिमन तिरकी, हेम केशवदत्ता मिश्रा, प्रशांत राही नारायण सांगलीकर, विजय नान तिरकी व पांडू पोरा नरोटे यांना दहशतवादी कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून जन्मठेपेसह विविध कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध सर्व आरोपींनी उच्च न्यायालयात अपिल केले होते. 2022 मध्ये न्यायूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने तांत्रिक कारणांवरून साईबाबांची निर्दोष सुटका केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करीत गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घेण्याची सूचना उच्च न्यायालयाला केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मीकी मेंनझेस यांच्या खंडपीठाकडे प्रकरण सोपविण्यात आले होते. अलीकडेच उच्च न्यायालयाने प्रा. साईबाबा यांना निर्दोष मुक्त केले. न्यायालयाचा निर्णय येताच साईबाबा यांना कारागृहातून सोडण्यात आले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!