Akola Politics : अकोला शहरात लावण्यात आलेले पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. महाविकास आघाडीला अकोल्यातील पोस्टरच्या माध्यमातून जाब विचारण्यात आला आहे. अकोला शहरातील रतनलाल प्लॉट, अशोक वाटिका, बस स्थानक, पंचायत समिती, नेहरू पार्क, कृषी नगर, अकोला जिल्हा परिषदेजवळ हे पोस्टर्स लागले आहेत. अकोल्यातील या पोस्टर्सवर अकोलेकरांकडून काही प्रश्न विचारण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र त्यामागे वंचित बहुजन आघाडी असावी असा संशय व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडी जर वंचित बहुजन आघाडीसोबत आहे, तर 2 फेब्रुवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंतअंतर्गत बैठक आणि चर्चेतून ‘वंचित’ला दूर का ठेवले? याचे उत्तर द्या, वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीचा भाग असेल, तर अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा का जाहीर केला नाही? काँग्रेस या मतदारसंघात आपला उमेदवार उतरविण्याची तयारी का करत आहे? महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला जाणीवपूर्वक हारणाऱ्या दोन जागा का देऊ केल्या आहेत? त्या जागा महाविकास आघाडीतील तीनही पक्ष गेल्या 15-20 वर्षांपासून जिंकलेल्या नाहीत. त्या जागा वंचित बहुजन आघाडीच्या माथी मारण्याचा का प्रयत्न केला जातोय? असे काही प्रश्नही या पोस्टर्सच्या माध्यमातून विचारण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी वंचित आणि महाविकास आघाडी एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात सुरू असतानाच अचानक दोघांमधील संवाद आणि आता काही प्रस्तावावर अडकले आहेत.
महाविकास आघाडीचा जागा वाटपासंदर्भातील तिढा सुटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चाच होत नसल्याचा आरोप होत आहे. ‘वंचित’ आणि महाविकास आघाडीतील बोलणी अडकली आहे. अशातच अकोला शहरात करण्यात आलेली पोस्टरबाजी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे वंचित आणि महाविकास आघाडीमधील मतभेद वाढले की काय, असे संशय येत आहे.