Beed : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. त्याचबरोबर सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून तब्बल 900 एकरवर जंगी सभा घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे.
आमच्या जीवावर जे बसले त्यांनी जरा लाज धरली पाहिजे. समाजाने अनेक वर्ष संघर्ष केला आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे. नाहीतर राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय समाज शांत बसणार नाही. घरा घरातली लेकरं मोठी करायची असतील तर घराच्या बाहेर पडावे लागेल. तुम्हाला राजकारण करायच आहे, ते करा त्याच काही देण घेणं नाही. माझा उद्देश माझ्या समाजाची पोरं मोठी झाली पाहिजे, एवढाचं आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.
लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात ही विराट सभा होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगीतले. मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर मराठा समाजाने सभेसाठी जागेची पाहणी सुरू केली असून, काहींनी तर सभेची तयारी देखील सुरू केली आहे.
नेमक काय म्हणाले मनोज जरांगे?
कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 900 एकर जागेवर सभा घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सभेची घोषणा केल्यानंतर सभेसाठी मैदानाचा शोध घेणे सुरु आहे. सभेची तारीख आणि ठिकाण अद्याप ठरलेलं नाही. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी ही विराट सभा होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगीतले आहे. गृहमंत्र्यांनी सत्तेचा आणि गुंडांचा वापर करून दडपशाही केली, त्यामुळे पुन्हा एकदा शांततेत कोट्यावधी मराठा एकवटणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.