Home » Rajya Sabha Election 2024 : एनडीएला बहुमतासाठी अवघे चार खासदार कमी

Rajya Sabha Election 2024 : एनडीएला बहुमतासाठी अवघे चार खासदार कमी

NDA Alliance : देशांतर्गत राजकारणावर होणार दूरगामी परिणाम

by नवस्वराज
0 comment

New Delhi : राज्यसभा निवडणुकीमुळे देशांतर्गत राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे. निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारमधील सहा आमदारांनी भाजपच्या बाजूने ‘क्रॉस व्होटींग’ केले. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या (एसपी) सात आमदारांनी ‘व्हिप’ धुडकावला. परिणामी भाजपला राज्यसभेत दोन अतिरिक्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एनडीएला वरिष्ठ सभागृहात बहुमतापेक्षा फक्त चार जागा कमी आहे. 2014 पासून भाजप आणि एनडीएला लोकसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे.

बहुमत मिळाल्यानंतर त्यांना कोणतेही कायदे मंजूर करण्याबाबत अडचण आलेली नाही. राज्यसभेत मात्र तसे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात मार्च 2015 मध्ये विरोधकांमुळे सरकारला ‘बॅकफूट’वर जावे लागले होते. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांबाबत राष्ट्रपतींच्या अभिभाषणासाठी विरोधकांनी धन्यवाद प्रस्तावातही दुरुस्ती केली होती. तेव्हापासून एनडीएला अवघड कायद्याचा विचार करताना बिजू जनता दल (BJD), वायएसआर काँग्रेस (YSRCP) आदीसारख्या अनेक तटस्थ पक्षांना सोबत ठेवावे लागले होते. मात्र यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस आमदारांनी आणि उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केल्यामुळे एनडीएला दोन अतिरिक्त जागा मिळाल्या आहेत.

राज्यभेत 56 सदस्यांनी शपथ घेतल्यावर राज्यसभेतील भाजपची संख्या 97 आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) संख्या 117 होणार आहे. 240 सदस्यांच्या सभागृहात बहूमतासाठी 121 सदस्य लागतात. बहुमतासाठी एनडीएला केवळ चार जागा कमी आहेत. 97 सदस्यांसह (पक्षात सामील झालेल्या पाच नामनिर्देशित सदस्यांसह) भाजप आता राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष झाला आहे. त्यानंतर काँग्रेसचा क्रमांक लागतो. काँग्रेसचे 29 सदस्य आहेत.  तृणमूल काँग्रेस 13, द्रमुक आणि आम आदमी पार्टीचे प्रत्येकी 10 सदस्य आहेत. बीजेडी आणि वायएसआरसीपी प्रत्येकी 9, बीआरएस 7, आरजेडी 6, सीपीआय (एम) 5 आणि एआयएडीएमके आणि जेडी(यू) प्रत्येकी 4 सदस्य राज्यसभेत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!