Mumbai : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अन्य नेते कायम केंद्र सरकार, भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टिका करतात. ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. ठाणे येथे नुकत्याच पार पडलेल्या एका सभेत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी राजीनामा द्यावा. मी त्यांच्या मतदार संघात येऊन निवडणूक लढवायला तयार असल्याचे आव्हान दिले. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्याचा शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाईंनी मार्मिक शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, स्वतः ला युवराज समजणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या सभांना जेमतेम दोन-तीनशे लोक उपस्थित असतात. यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येते. ज्यांना जिंकण्यासाठी दोन विधान परिषदेच्या जागा द्याव्या लागतात, नंतर निवडणूक लढवावी लागते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देणे हास्यास्पद आहे. असा खरमरीत टोला शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता केवळ ठाणेपूर्ती मर्यादित नसून ते संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमावस्या-पौर्णिमेला रात्री चंद्रप्रकाशात कशाची शेती करतात? त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. तेथे दोन- दोन हेलिकॉप्टर उतरतात असे हे गरीब शेतकरी आहेत, अशी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या विधानावर देसाईं यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की, ज्यांनी शेतात कधीच काम केले नाही. जे कधीच शेतात जात नाही, त्यांनी सवड काढून एकनाथ शिंदे यांची शेती बघण्यासाठी आवश्य जावे. पुढील काळात ठाकरे गटाची परिस्थिती बिकट होणार असल्याचे भाकितही शंभूराज देसाई यांनी केले.