Hariyana | हरियाणा : हरियाणातील सिरसा येथील चौधरी देवीलाल विद्यापीठातील 500 विद्यार्थिनींनी एका प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थिनींनी राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, राज्यपाल आणि महिला आयोगाला पत्र लिहून सदर बाब कळवली आहे. प्राध्यापक त्यांना आपल्या चेंबरमध्ये बोलावून घृणास्पद कृत्य करतात. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यासोबत हा प्रकार सुरू असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
मुलींनी लिहिलेले पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे वाचून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. (500 Female Student Wrote Letter To CM, Governer And State Commission For Women About Harassment)
मुलींनी या प्राध्यापकाविरोधात तक्रार करण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीने या आरोपी प्राध्यापकाला दोन वेळा निर्दोष सोडले आहे. आता याप्रकरणी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. एएसपी दीप्ती गर्ग यांनी सांगितले की, सर्वप्रथम आम्ही पत्रातील आरोपांची चौकशी करू, यातून जे काही समोर येईल त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल. आरोपी प्राध्यापकाने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावत, हे सर्व राजकीय दबावामुळे होत असल्याचा दावा केला आहे.