गडचिरोली : धान खरेदी व भरडाईत गैरव्यवहार केल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळ गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन रमेश कोटलावार यांना ८ ऑगस्ट रोजी निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी चौकशीनंतर कोटलावार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आदिवासी विकास महामंडळ, नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी काढले आहे.
प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्याबाबत महामंडळाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने कोटलावार यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला. त्यात भात गिरणीमध्ये विद्युत जोडणी झाली नसतानाही भरडाईचा करारनामा करण्यात आला. धानाची भरडाई करणाऱ्या गिरणी मालकांना बँक गॅरंटीपेक्षा जास्त डीओ देणे, राष्ट्रीयीकृत बँकेची गॅरंटी न घेता सहकारी बँकेची गॅरंटी घेऊन धान भरडाईस परवानगी देणे. धान भरडाईच्या तुलनेत विजेचा वापर, अशा अनेक गैरप्रकारात कोटलावार यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. यात कोटलावार दोषी आढळल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ४२ गिरणी मालकांचीदेखील चौकशी करण्यात आली असून कारवाईसाठी सदर चौकशी अहवाल जिल्हाधिकारी व गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. त्यामुळे घोटाळ्यात सहभागी गिरणी मालकांचे धाबे दणाणले आहे.