अकोला : अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.
अतिवृष्टीमुळे पिकांची प्रचंड हानी झाली असून, शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, असा ठराव शुक्रवारी कृषी समितीच्या सभेत घेण्यात आला. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजानुसार शेत जमीन व पिकांसह एकूण एक लाख ४२ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जुलै मध्ये १३, १९, २२ व २३ तारखेला अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी ३४ मंडळे अतिवृष्टीत बाधित झाली. आपत्तीमुळे तीन व्यक्ती मृत्यू पावल्या. पिकांच्या नुकसानीचे कृषी, महसूल व जि.प. तर्फे संयुक्त पंचनामे करण्यात येत आहेत. लवकरच नुकसानाचे अंतिम चित्र स्पष्ट हाेणार आहे.
कृषी समितीच्या सभेत नुकसान भरपाईबाबत चर्चा करून ठराव घेण्यात आले. सभेला सभापती योगिता रोकडे, प्रमोदीनी कोल्हे, अर्चना राऊत, नीता गवई, वेणू डाबेराव, सुनंदा मानतकर, गीता मोरे, रायसिंग राठोड आदी सदस्य उपस्थित होते.