अकोला : चांदूर बाजार तालुक्यातील चिंचोली काळे येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील गोदामातून १५ पोते सोयाबीन लंपास करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले.
प्रकरणातील दोन आरोपी अद्याप पसार आहेत. ही घटना १३ ते १४ ऑगस्ट दरम्यान घडली होती. नीलेश विनायक अर्डक (३८), पवन विनायक सरोदे (३९), राजेश मारोतराव गायकवाड (३९, सर्व रा. चिंचोली काळे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. १३ ऑगस्ट रोजी चिंचोली काळे येथील रहिवासी बकुल सुनील वानखडे यांच्या शेतातील गोदामातून सोयाबीनचे १५ पोते लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी बकुल वानखडे यांनी १४ ऑगस्टला चांदूर बाजार ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तपासात सदर गुन्ह्यात नीलेश अर्डक, पवन सरोदे व राजेश गायकवाड यांचा हात असल्याचे समोर आल्यावर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्याकडून ४५ हजार रुपयांचे ९ क्विंटल सोयाबीन जप्त करण्यात आले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी आरोपींना मुद्देमालासह चांदूर बाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पीएसआय नितीन चुलपार, संतोष मुंदाने, रवींद्र बावणे, गजानन दाभणे, भूषण पेटे यांनी केली.