Home » Washim News : कुपोषित बालकांचा प्रश्न मिटता मिटेना

Washim News : कुपोषित बालकांचा प्रश्न मिटता मिटेना

Vaibhav Waghmare : वाशीममधील समस्या हद्दपार करण्यासाठी प्रयत्न गरजेचे

by अश्विन पाठक
0 comment

Washim : कुपोषण मुक्तीसाठी सरकार भरपूर प्रयत्न करीत असले तरी कुपोषित बालकांची समस्या गंभीर आहे. वाशीम जिल्ह्यात 11 हजारांवर कुपोषित बालके आढळून आल्यामुळे सरकारतर्फे युद्धस्तरावर पावले उचलण्यात येत आहेत. नव्याने रुजू झालेले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी यासंबंधी आढावा बैठक घेऊन 15 ऑगस्टपर्यंत कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह बैठक घेऊन जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी धडक कृती आराखडा तयार करून त्याचे नियोजन केले. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी जिल्ह्यातील कुपोषणाची परिस्थिती विशद केली. त्यांनी सांगितले की शून्य ते पाच या वयोगटातील 285 बालके ही अतितीव्र (सॅम) श्रेणीत आहेत. 1 हजार 67 बालके तीव्र (मॅम) श्रेणीत आहेत. एकूण 1 हजार 352 बालके कुपोषित आहेत. 2 हजार 120 बालके (एसएडब्लू) आणि (एमयूडब्लू) बालके 9 हजार 365 असे एकूण 11 हजार 485 बालके जिल्ह्यात कुपोषित असल्याचे सांगून यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

आईच्या दुधात कुपोषण दूर करण्याची मोठी क्षमता असते. आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून स्तनदा आणि गरोदर मातांना स्तनपान करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. आशा व अंगणवाडी सेविकांना देखील पोषणाबाबत दोन महिन्यामध्ये तीन वेळा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लहान मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास होणे आवश्यक असून ही महत्वाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे. जेथे कुपोषित बालके असतील त्या अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक सॅम, मॅम बालकांकडे दोन महिने विशेष लक्ष देतील. प्रत्येक अंगणवाडीसाठी एक पालक कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येईल.

कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष देण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्याची असेल. पालक कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याला पालक अधिकारी तसेच सहाय्यक पालक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे म्हणाले, कुपोषित मुलांकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास, त्याचे योग्य पोषण केल्यास दोन महिन्यात त्याला कुपोषणातून बाहेर काढता येते.

काय म्हणाले वैभव वाघमारे ?

मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे म्हणाले की, कुपोषण हा गंभीर आजार नसला तरी याकडे दुर्लक्ष केल्यास जीवघेणा ठरु शकतो. यामुळे बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकास खुंटतो. सुदृढ पिढी घडविण्यासाठी जिल्ह्यातून कुपोषण हद्दपार होणे आवश्यक आहे. यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!