न्यूयॉर्क : हॉलीवूडमध्ये लेखक आणि अभिनेत्यांचा संप नवा विक्रम रचत आहे. जास्त वेतन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वाढता वापर याच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. २ मे पासून हा संप कायम आहे. ६३ वर्षांतील हा हॉलीवूडमधील सर्वांत मोठा संप आहे. हा संप आतापर्यंत ११५ दिवसांपेक्षा जास्त कायम आहे.
संपामुळे हॉलीवूडमधील मोठे प्रोडक्शन हाऊस बंद झाल्याने १० हजारांपेक्षा जास्त व्हीएफएक्स आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स (सीजी) कलाकारांचे रोजगार संकटात आले आहेत. हे दहा हजार कलाकार भारतीय आहेत. या ऐतिहासिक संपामुळे अमेरिकी टीव्ही आणि चित्रपट उद्योग पूर्णपणे ठप्प झाला आहे. संपामुळे सुमारे ११ लाख कोटी रुपयांचे हॉलीवूड चित्रपट उद्योगातील काम ठप्प झाले आहे. संपामुळे भारतीय वंशाच्या कलाकारांना तीन महिन्यांपासून विनाकामाने दिवस काढावे लागत आहेत. त्यामुळे भारतीयवंशाचे व्हीएफएक्स आर्टिस्ट आणि भारतीय व्हीएफएक्स उद्योगावर वाईट परिणाम झाला आहे. हजारो व्हीएफएक्स आणि ॲनिमेशन आर्टिस्टना तीन महिन्यांपासून काम मिळेनासे झाले आहे. २०२२ मध्ये भारताच्या ॲनिमेशन उद्योगाने १०७८ कोटींचा महसूल गोळा केला. भारतात ९०० ॲनिमेशन, १२० व्हीएफएक्स व १८७ गेम डेव्हलपमेंटचे स्टुडिओ आहेत. त्यात सुमारे ४० हजार लोक काम करतात.
अँटी ग्रॅव्हिटी व स्क्रीन स्फोटांचे दृश्य भारतीय कलाकार मुंबई, बंगळुरू, हैदराबाद व चैन्नईत तयार करतात. संपामुळे अनेक अमेरिकी टीव्ही शोचे काम बंद झाले आहेत. त्याचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे. हॉलीवूडमध्ये भारतीय व्हीएफएक्स कलाकार व ॲनिमेटर्सची खूप जास्त मागणी आहे. ऑस्कर जिंकणाऱ्या वाली द शेप ऑफ वॉटर, मार्व्हल चित्रपटाचे ॲव्हेंजर्स, थोर : रेग्नारोकशिवाय हॉलीवूड ब्लॉक बस्टर्स फेट ऑफ फ्युरियस, हेंडमेडस टेल, स्त्रेक, ग्रॅव्हिटी, अवतार, मेलेफिसिएंट आणि इंटरस्टेलरमध्ये भारतीय व्हीएफएक्स कलाकारांनी काम केले आहे.