Mumbai : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक 28 फेब्रुवारी रोजी पार पडली. बैठकीत नंतर उबाठा गटाचे प्रवक्ता खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी सर्वप्रथम संवाद साधला. बैठकीत शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रस व वंचित आघाडीचे नेते उपस्थित असल्याचे राऊत यांनी सांगितले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे दूरध्वनीवरून बैठकीतील घडामोडींची माहिती घेत होते. तिन्ही पक्षांची जागा वाटपा संदर्भात निर्णायक चर्चा होऊन जागावाटप सुरळीतपणे झाले. आमच्यात याक्षणी कुठलेही मतभेद नाहीत असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
आम्ही सर्वांनी प्रत्येक जागेबद्दल तसेच कोण कुठे जिंकू शकते यावर चर्चा केली. कोण किती आणि कुठली जागा लढवतय ते महत्त्वाचे नसून, जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. 4 पक्षांमध्ये 48 जागांच वाटप झालं आहे. आमच्यासोबत अन्य लहान पक्षही आहेत, असे राऊत यांनी सांगितले. वंचित आघाडीच्या 27 जागांच्या प्रस्तावावर राऊत यांना छेडले असता, ते म्हणाले की, वंचित आघाडीने 27 जागांच सुत्र सांगितलेले नाही, त्यांनी केवळ इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस महाराष्ट्रासह दशभर आहे, आमचा तसेच राष्ट्रवादी पक्ष देखील महाराष्ट्रभर आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष 48 जागांवर आहे, ज्याची जेथे ताकद आहे, त्यावर चारही पक्ष चर्चा करत आहेत. त्यानुसार आम्हाला जागा आपसात वाटून घ्याव्या लागतील. वंचितने दिलेल्या प्रस्तावाचा कागद मोठा दिसत असला, तरी पक्षाने राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात केलेल्या कामाची माहिती त्यात दिली आहे. देशात आणि राज्यात लोकशाही आणून संविधानाचे रक्षण करणे हा आमचा मुळ उद्देश आहे. पृथ्वीराज चव्हाणांसारख्या अनुभवी नेत्याच मार्गदर्शनही आम्हाला लाभते आहे. अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.