Nagpur : यावेळची लोकसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसून येते. रामटेकमध्ये भाजपने काँग्रेस पक्षातील उमरेडचे आमदार राजू पारवे यांना महायुतीमध्ये घेऊन शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने नागपूरमध्ये आपला उमेदवार न देता काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला. याचा फटका थेट भाजपला बसण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार सागर डबरासे यांना सुमारे 26 हजार मते मिळाली होती. वंचितची ही मते काँग्रेसची मानली जातात. ती जर काँग्रेस उमेदवारास मिळाली तर नितीन गडकरी यांच्या मतांवर परिणाम होऊ शकतो.
वंचित बहुजन आघाडीने यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूरमध्ये वंचित तर्फे उमेदवार देण्यात आला नसल्याने थेट भाजपलाच आव्हान दिले आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मताधिक्यात घट होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या कृतीमुळे वंचित बहूजन आघाडी ही भाजपची ‘बी टीम’ असल्याच्या मुद्द्याला, पूर्णविराम मिळाला आहे.
वंचित बहूजन आघाडी आणि महाविकास आघाडीत अनेक दिवसांपासून वाटाघाटीचे गुऱ्हाळ सुरू आहे. मात्र अद्यापही जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून वंचित तर्फे कोणाला उमेदवारी देण्यात येते याची उत्सुकता सर्वांना लागली होती. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष तसेच नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर करून भाजपवर कुरघोडी केली आहे. वंचितच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसने प्रचाराच्या पहिल्याच फेरीत भाजपवर आघाडी घेतल्याची चर्चा आहे.
पाच लाखांच्या मताधिक्क्याने आपण निवडून येणार असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार सागर डबरासे यांना 26 हजार मते मिळाली होती. ही मते तशी काँग्रेसची मानली जातात. ती काँग्रेस उमेदवाराना मिळाल्यास गडकरी याचे मताधिक्क्य कमी होऊ शकते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केले होते. त्यामुळे मतांच्या विभाजनाचा फटका काँग्रेसच्या मोठ्या उमेदवारांना बसला होता.
प्रकाश आंबेडकर हे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढले होते. शिंदे व चंद्रपूरचा उमेदवार वगळता काँग्रेसचे सर्व उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना यावेळी सुरुवातीपासूनच सोबत घ्यावे असे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मत होते. मात्र जागा वाटपाच्या वाटाघाटीला यश आलेले नाही. रामटेक लोकसभा मतदारसंघाचा निर्णय वंचितने राखून ठेवल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी 27 मार्च रोजी सकाळी अकोला येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
काँग्रेसचे 2019 मधील रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार किशोर गजभिये हे वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात पोहोचले असल्याची माहिती आहे. त्यामुळे वंचित रामटेकच्या बाबतीत काय निर्णय घेते, हे समजण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. भाजपचे माजी जि.प. सदस्य शंकर चहांदे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.