Amravati : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अशात राज्यातील काही बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पार्टीत गेले की उमेदवार लवकर निवडून येतो. काँग्रेसमधून निवडून येऊ शकत नाही. भाजप आणि काँग्रेस नसले तर प्रहार आहेच, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू म्हणाले.
हाती झेंडा घेतला म्हणजेच भाजपच होतो असे नाही. नवनीत राणा यांचे अंतर्मन भाजपचे आहे. आधी नवनीत राणा या हिरवा, भगवा आणि निळा झेंडा घेऊन निवडणूक लढल्या. आता त्या भगवा झेंडा घेऊन निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. हिंदू शेरणी झाल्या आहेत. भाजप आता नवनीत आणि रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष देखील संपविणार आहे. भाजपमध्ये जाऊन त्यांचा ‘स्वाभिमान’ संपायला नको असा असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लगावला. गरीबांची मदत करुन त्यांना सामोरे नेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन मार्ग असतात एक गरीब आणि दुसरा श्रीमंतांसाठी असतो. श्रीमंत समृद्धी महामार्गे जाईल आणि गरीब खड्ड्यातून जाईल. गरीबीचा मार्ग शिक्षणाने मोकळा होऊ शकतो. दहावीचे शिक्षण म्हणजे पूर्ण शिक्षण व्यवस्था नाही म्हणून हा विचाराचा बदल आपण आणला पाहिजे. मुलांना फॅक्टरीमध्ये घातल्या सारखे करू नका. मेरीट म्हणजेच सर्वकाही नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.
महायुतीला थेट इशारा
महायुतीमधील घटक पक्षांचे नेते एकमेकांविरुद्ध जाहीरपणे भूमिका घेताना दिसत आहेत. यामध्ये आता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा महायुतीवर टीका करत थेट इशारा दिला आहे. मुख्यमंत्री असोत किंवा उपमुख्यमंत्री त्यांनी आमच्या लहान पक्षांसोबत चर्चा करावी. जेणेकरून आम्हाला कशा पद्धतीने समोर घेऊन जाणार आहात, जागा वाटप बद्दल काय निर्णय घेण्यात येत आहेत हे सांगावे. अन्यथा आम्ही आमचा स्वतंत्र्य निर्णय घेऊ. आम्हाला कुणाचेही बंधन नसून, आमचा कोणी मालक नसल्याचे बच्चू कडू म्हणाले.