Home » Shiv Sena : साहेब शहराकडे थोडे अधिक लक्ष द्या

Shiv Sena : साहेब शहराकडे थोडे अधिक लक्ष द्या

Akola Corporation : शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मनपा आयुक्त सुनील लहाने यांच्याकडे मागणी

by नवस्वराज
0 comment

Akola : मालमत्ता करावर लावण्यात आलेली शास्ती, स्वाती कंपनीला विनाकारण देण्यात येत असलेले 8.5 टक्के कमिशन, मोर्णा नदीतील जलकुंभी निर्मूलन, मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि पिण्याच्या पाण्याची समस्या. अकोला शहर गेल्या अनेक वर्षांपासून अशा समस्यांना तोंड देत आहे. त्यामुळे आयुक्त पदाचा कार्यभार घेतल्यानंतर शहराच्या विविध मुद्द्यांकडे ‘जरा अधिक लक्ष द्याच साहेब’, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महापालिका आयुक्तांना करण्यात आली आहे.

कविता द्विवेदी यांच्या बदलीनंतर अकोला महापालिका आयुक्त पदावर डॉ. सुनील लहाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लहाने यांनी आयुक्त पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ. लहाने यांची भेट घेतली. आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. लहाने यांचे स्वागत करतानाच त्यांना शहरातील समस्यांबाबत अवगत केले. अकोला पश्चिम तथा शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा, उपजिल्हा प्रमुख गजानन बोराळे, माजी नगरसेविका मंजुंषा शेळके, शहर संघटक अनिल परचुरे, माजी नगरसेवक गजानन चव्हाण, शरद तुरकर यांनी मनपा आयुक्तांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. अकोलेकरांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्याचा आग्रह यावेळी त्यांच्याकडे करण्यात आला.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आयुक्तांना मालमत्ता करावर शास्ती न लावण्याची मागणी केली. स्वाती कंपनी विनाकारण नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कोणतेही ठोस कारण नसताना स्वाती कंपनीला 8.5 टक्के कमिशन देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीत जलकुंभीची प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. ही जलकुंभी काढण्याची मागणी करण्यात आली. शहरात मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा, मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. त्याचा बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली. शहरातील समस्या सोडविण्याला आपण प्राधान्य देऊ अशी ग्वाही यावेळी आयुक्त डॉ. सूनील लहाने यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे संजय अग्रवाल, प्रकाश वानखडे, अंकुश सित्रे, आकाश राऊत, चेतन मारवाल, आशु मिश्रा, गणेश मालटे, रवी मडावी, नारायण मानवटकर, मनोज तायडे आदी उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!