बुलडाणा : शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उलथापालथ सुरूच आहे. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी देशभरातील सर्वपक्षीय नेते आणि इतर पक्षांचे प्रमुखांनी लाऊन धरल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची सूत्रे आपल्याकडेच ठेवली आहेत. त्याचवेळी शिवसेना नेते आणि बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पवारांच्या राजीनाम्याचे पाऊल हे पक्षात सुरू असलेली संभाव्य बंडखोरी थांबवण्यासाठी केलेली खेळी असल्याचे आमदार गायकवाड यांनी म्हटले.
बुलडाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना गायकवाड म्हणाले, ‘शरद पवार हे देशाचे नावाजलेले नेते आहेत, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षात जे काही सुरू आहे, ते पाहता एक गोष्ट लक्षात येते की, हे सर्व ठरवून करण्यात आलेले आहे.’ ‘बंडाची सुरुवात थांबविण्यासाठी हा राजीनामा नावाचा बॉम्ब फेकण्यात आला.’ गायकवाड पुढे म्हणाले की, ‘सर्वांना आपल्या बाजूने ठेवण्यासाठी पवारांनी इमोशनल ब्लॅकमेल आणि राजीनाम्याचा अवलंब केला होता.’
गायकवाड पुढे म्हणाले, “मागील अनुभव लक्षात घेता पवार साहेबांनी जे सांगितले ते कधीच केले नाही. अजित पवारांनी पक्षात जी बंडखोरी पेरली होती, ती नष्ट करण्यासाठीच राजीनामा दिल्याचे पवार बोलले. या निर्णयाविरोधात कार्यकर्ते बंड करतील आणि सर्व एकत्र येतील, हे त्यांना माहीत होते. त्यामुळे अजितची बंडखोरी तिथेच संपेल.”