नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठवे महाअधिवेशन तिरूपती येथे होणार आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बबनराव तायवाडे यांनी ही माहिती दिली.
तिरुपती येथे ७ ऑगस्ट २०२३ रोजी हे अधिवेशन होणार असल्याचे डॉ. तायवाडे यांनी स्पष्ट केले. यावेळी बीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, आंध्र प्रदेश बीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शंकर अण्णा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, क्रांती कुमार, भास्कर गौड, नगमल्लेश्वर गौड उपस्थित होते. जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसींसाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रिमिलेअरची मर्यादा मागील सहा वर्षांपासून वाढली नाही, ती वाढविण्यात यावी, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढविण्यात यावी आदी मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. एकूण २६ मागण्यांवर मान्यवरांच्या उपस्थितीत या अधिवेशन चर्चा होणार आहे. अधिवेशनातील मागण्या पूर्ण करण्यासंबंधी ठराव पारित करून केंद्र सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. तायवाडे यांनी स्पष्ट केले.