अभिजीत कराळे | Abhijeet Karale
Gadchiroli : छत्तीसगड-महाराष्ट्र सिमेवरील गडचिरोलीतील वांगेतुरीजवळ माओवादी व पेालिसात संघर्ष उडाला. आपली बाजू कमकुवत आहे हे लक्षात येताच माओवाद्यांनी जंगलात पळ काढला. चकमकीनंतरच्या शोधमोहिमेत मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त करण्यात आलीत. पोलिसांनी गेल्या काही दिवसात केलेल्या धडक कारवाईमुळे गडचिरोलीतील माओवाद्यांचे खच्चीकरण झाले आहे.
पुर्वी गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक असलेले संदीप पाटील यांना नुकतीच पदोन्नती देण्यात आली आहे. पाटील आता नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकारातून जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात पोलिसांनी 24 तासात पोलिस चौक्या उभारल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीचा अंत करण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या धडक कारवाईमुळे माओवादी चळवळीला मोठा फटका बसला आहे. वांगेतुरीपासून सात किलोमीटर अतंरावर असलेल्या हिदूर गावात विध्वंसक कारवाईसाठी माओवादी रेकी करीत असल्याची माहिती नक्षलविरोधी पथकाला मिळाली.
माओवादी वांगेपल्ली व गर्देवाडा याण पोलिसांनी 24 तासात उभारलेल्या चौक्यांवर हल्ला करणार असल्यााचे पोलिसांच्या लक्षात आले. माहिती मिळताच नक्षलविरोधी अभियान पथक सावध झाले. अपर पोलिस अधीक्षक यतीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी- 60 पथकाने शोध सुरू केला. पथक हिदूर गावाजवळ पोहचताच माओवाद्यांकडून पथकावर गोळीबार सुरू झाला. पोलिसांनी गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. आपली बाजू कमकुवत झाल्याचे लक्षात येताच माओवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत जंगलात पळ काढला.
नक्षलविरोधी पथकाने चकमकीनंतर परिसरात शोधमोहिम राबविली. यात पिट्टु, स्फोटके, अभियानाचे साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेरर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनल व इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी साहित्य जप्त केले आहे. माओवाद्यां विरोधात पोलीस सक्त झाले आहेत. झालेल्या अनेक चकमकींमुळे माओवादी चळवळीला जबरदस्त हादरा बसला आहे. माओवाद्यांचे अनेक जहाल नेते व सदस्य मारले गेल्याने त्यांच्या विध्वंसक हालचाली थोड्या मंदावल्या आहेत.