मराठीला अभिजात दर्जा देण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. बोलीभाषेतील दहाव्या क्रमांकावर असलेल्या मराठीला आपल्याच घरात अजून किती दिवस हाल सोसावे लागणार असा प्रश्न कधी कधी पडतो…
कवी सुरेश भटांच्या लाभले आम्हास भाग्य या काव्यओळींना स्वरबद्ध करण्याची संधी मला या जीवनात प्राप्त झाली. आदीअनंत काळापासून प्रचलित असलेल्या मराठीची सेवा करण्याचे हे अहोभाग्य लाभल्याचा मला आजही अभिमान आणि आनंद आहे. अनेकांच्या मोबाईलवर आजही हे गाणं रींगटोन म्हणून वाजल्यानंतर अभिमानानं उर भरून येतं, पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी करावा लागणारा संघर्ष पाहून कधीकधी दु:ही होतं.
मराठी ही केवळ महाराष्ट्राचीच भाषा आहे असे नाही. गोवा, उत्तर कर्नाटक, दक्षिण गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, छत्तीगसगड, दमण आणि दीव, दादरा व नगर हवेली अशा देशाच्या अनेक कानाकोपऱ्यात मराठी केव्हाच पोहोचलीय. सातासमुद्रापार असलेल्या फिजी, मॉरीशस, इस्त्रायल, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी जगाच्या पाठीवरील अनेक देशात मराठीचे पाऊल पुढे आहे. परंतु दुर्दैव की आम्ही आपल्याच मातीत आपल्याच मातृभाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून राजदरबाराचे उंबरठे झिजवतोय. इ.स १२०० पूर्वीचा काळ, यादव काळ, बहामनी, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे आणि अगदी इंग्रजांच्या काळातही मराठीचे सबळ पुरावे आहेत. पण आजही मराठी आपल्याच घरात हाल सोसत आहे.
अन्य कोणत्याही भाषांचा द्वेष करावा असे मी अजिबात म्हणणार नाही, परंतु आपल्याच मराठी घरातील मुलं जेव्हा मातृभाषा सोडून हिंदी, इंग्रजी आणि अन्य भाषांमध्येच संभाषण करतात त्याला काय म्हणावे. मुळातच मराठी भाषा ही सुंदर आहे. अहिराणी, तावडी, देहवाली, कोकणी, माणदेशी, मालवणी, कोही, कोल्हापुरी, चंदगडी, बेळगावी, मराठवाडी, नागपुरी, वऱ्हाडी, झाडीबोली, नारायणपेठी, तंजावर, नंदभाषा, भटक्या विमुक्तांकडून बोलली जाणारी वेगळ्या प्रकारची मराठी असे कितीतरी सुंदर पैलू मराठी नावाच्या हिऱ्याला आहे. पण आपण मराठीला आपल्यापासूनच दूर लोटत आहोत असे कधीकधी वाटते. ज्ञानोबा-तुकोबांच्या याच मराठी मुलखात, शिवरायांच्या याच स्वराज्यमयी महाराष्ट्रात मराठी चित्रपट सिनेमाघरांमध्ये दाखवावे यासाठी आदेश काढावे लागतात. आघाडीच्या रेडिओ चॅनल्सवर किती मराठी बोलली जाते, आम्ही किती मराठी जाणतो, चुकीची मराठी बोलून, लिहून आम्ही आपल्याच भाषेचा खून कसा पडतो याचा विचार होणे गरजेचे आहे. गुढीपाडव्यापासून रंगपंचमीपर्यंत वेगवेगळ्या सणांचा आनंद घेणाऱ्या आम्ही मराठ्यांच्या घरातून आई-बाबा नव्हे तर मम्मी-पप्पा कानावर पडते. चैत्र ते फाल्गुन, रविवार ते शनिवार किती जणांना येते? इंटरनेट आणि यू-ट्युबच्या विश्वात शुभंकरोती कल्याणम्ची जागा दिवाणखान्यातील देव्हाऱ्याने कधी घेतली व त्यावरील अन्य भाषांचा प्रभाव आपल्यावर केव्हा झाला हे कुणालाही कळले नाही.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हे चित्र बदलणे नितांत गरजेचे आहे. मी मराठी ही अस्मिता जपणे गरजेचे आहे. मी मराठी बोलेल, मराठी लिहेल, मराठी जपेल आणि मराठी जगेल असा ठाम निश्चय केला जावा. सरकार दरबारी केवळ मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यापुरती हे कार्य थांबायला नको. सरकारी कामकाज, आदेश पत्र जसे हिंदी, इंग्रजीतून निघतात तसे मराठीतूनच व्हायला हवे. मराठी साहित्य, कलाकृती, नाट्य, नृत्य, गीत, संगीत, चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन मिळायला हवे. यासाठी सर्वांनी एकच पक्का निश्चय मनाशी करावा की धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी…!