भूषण इंदोरीया | Bhushan Indoriya
Crime News : हुंडाबळीच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हुंडाविरोधी कठोर कायदा असूनही अनेक मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जातो. अशीच एक भयंकर घटना वाशिमच्या वाघजाळी गावात घडली आहे. हुंड्यासाठी (Dowery) मेघा शिंदे या नवविवाहितेची तिचा पती, सासू आणि सासऱ्याने गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मेघा शिंदे (Megha Shinde) रा. चिखली या तरुणीचा विवाह काही महिन्या अगोदर वाघजाळी येथील गजानन शिंदे (Gajanan Shinde) या तरुणाशी झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मेघाने माहेरून चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी 5 लाख रूपये आणण्याचा तगादा पती गजाननने लावला. मेघाच्या वडिलांनी काही रक्कम धनादेशा द्वारा दिली. आणखी पैसे आणण्यासाठी मेघाचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. त्यामुळे मेघा आणि तिच्या सासरच्या कुटुंबियांमध्ये नेहमी खटके उडत होते. शनिवार 27 जानेवारी रोजी मेघा ही आपल्या पती, सासू आणि सासऱ्यासह शेतात गेली असता तिथे त्यांच्यात पुन्हा पैसे आणण्यावरून वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यावर सासू, सासरे आणि पती या तिघांनी मेघावर चाकूने वार केले. जखमी अवस्थेत मेघाला वाशिम येथील रूग्णालयात दाखल केले असता अतिरिक्त रक्तस्राव झाल्यामुळे तिची प्राणज्योत मालवली. या हृदयद्रावक घटनेमुळे वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पती गजानन शिंदेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी मेघाच्या माहेरच्या कुटुंबीयांनी वाशीम ग्रामीण पोलिसात (Washim Police) तक्रार दिल्यावरून मृत मेघाचा पती गजानन बबन शिंदे, सासरा बबन श्यामराव शिंदे आणि सासू पार्वती बबन शिंदे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अनिता इंगोले करत आहेत.