अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याचे निनावी पत्र गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी प्राप्त झाले आहे. काही संशयित लोक राजस्थान सीमेवरून अमरावती येथे आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्र पाठवणारी व्यक्ती अमरावती येथील आहे. तुम्ही माझी खूप मदत केली. मी तुमचा हितचिंतक आहे. म्हणून मी तुम्हाला सतर्क करत असल्याचे त्याने सांगितले आहे. पत्राच्या शेवटी- शेवटी खुदा हाफीस असे लिहिले आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या शंकर नगर स्थित निवासस्थानी हे निनावी पत्र प्राप्त झाले आहे. या संदर्भात युवा स्वाभिमान संघटनेचे विनोद गुहे यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार दिली आहे. ‘मी शासकीय नोकरी करत आहे. आपण माझी अनेक कामात मदत केली. कोरोना काळात आपण माझ्या वडिलांची मदत केली होती. काही लोक आपला पाठलाग करत असल्याची माहिती असून आपण सांभाळून राहावे’, असे पत्र पाठविणाऱ्याने लिहिले आहे.
पत्राची दखल घेत राजापेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी खासदार, आमदार राणा यांचे निवासस्थानी भेट दिली आहे. एसीपी गायकवाड यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. पोलीस यंत्रणा निनावी पत्राच्या आधारे शोध घेत आहे.