Buldhana Crime: पैसे कमाविण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. बुलढाण्यात असाच एक प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. काही लोक नकली नोटा घेऊन जात असल्याच्या माहिती पोलिसांना मिळाली. कारवाईत करीत पोलिसांनी साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. खेळण्यातील चिल्ड्रेन बँक नोटांच्या बंडलावर खऱ्या नोटा चिटकवून चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-अकोला मार्गावरील टेंभुर्णा फाट्यावर करण्यात आली. यातील एकावर यापूर्वी नकली नोटाप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील चार व्यक्ती एका वाहनातून फसवणूक करण्याच्या हेतूने बनावट नोटा घेऊन जात असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांना मिळाली. खात्री पटल्यानंतर सापळा रचण्यात आला. पथकही तैनात करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी एक वाहन अडविले. त्यावर बनावट नंबर प्लेट होती. पोलिसांचा संशय बळावल्याने वाहनाची झडती घेण्यात आली. हे वाहन खामगाव-अकोला मार्गावरील टेंभुर्णा फाट्यावर अडविण्यात आले.
झडतीत एका निळ्या व काळ्या रंगाच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात नोटा आढळून आल्या. पोलिसांनी निरीक्षण केल्यावर नोटा नकली असल्याचे आढळले. या बॅगेत 500 रुपयांच्या 849 नोटा, 200, 100, 50 आणि 10 रुपयांच्या काही नोटा होत्या. भारतीय चलनाच्या काही नोटा, सहा मोबाइल, सेलोटेप, कात्री, MH-12, VF-7775 क्रमांकाची बनावट नंबर प्लेट असलेली कार असा एकूण 14 लाख 58 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चिल्ड्रेन बँकेच्या 61 बंडलांवर खऱ्या नोटा चिकटवून फसवणुकीच्या उद्देशाने निघालेल्या चारही आरोपींना पोलिसांनी वाटेतच जेरबंद केले. सचिन भास्कर दुतोंडे , (रा. बर्डे प्लॉट, खामगाव), मयूर किशोर सिद्धपुरा, विलास बाबुराव ठाकरे (दोघेही रा. अभय नगर, दंडेस्वामी मंदिराजवळ, खामगाव), लखन गोपाल बजाज (रा. दंडेस्वामी मंदिराजवळ) यांना अटक करण्यात आली.