Akola News : चैत्र शुक्ल प्रतिपदा, शके 1946 मंगळवार 09 एप्रिल रोजी हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात संस्कृती संवर्धन समितीच्यावतीने भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जुने शहरातील राजेश्वर मंदिरातून रॅलीला सकाळी सुरुवात झाली. नागरीक पारंपरिक वेशात रॅलीमध्ये सहभागी झाले होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, आमदार रणधीर सावरकर, समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, कार्याध्यक्ष हरीश अलीमचंदानी, अनुप धोत्रे, डॉ. अभय पाटील यांच्या हस्ते श्री राजराजेश्वर व श्रीराम रथाचे पूजन करून रॅलीला सुरुवात झाली.
रॅली मार्गातील राजराजेश्वर मंदिर, काळा मारोती मंदिर, मोठे राम मंदिर, जैन मंदिर, राणीसती धाम, गुरुद्वारा, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, बिर्ला जलाराम मंदिर, बिर्ला राम मंदिर येथे धर्मध्वजाचे वाटप करण्यात आले. अशोक वाटिकेत पराग गवई यांच्या उपस्थितीत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून माल्यार्पण केले.
विविध धार्मिक, सामाजिक, सेवाभावी, ज्ञाती संस्था स्वागत यात्रेत सहभागी झाल्या होत्या. भगवान श्रीराम रथ, मंगलवेश, पारंपारिक वेश परिधान केलेले स्त्री, पुरुष, बुलेटस्वार महिला, संकल्प ढोल पथकाचे वादन, श्री समर्थ पब्लिक स्कूलचे लेझीम पथक, स्केटिंग करणारी लहान मुले, गुलाबबाबा बँड पार्टी यात्रेचे प्रमुख आकर्षण होते.
प्रमुख चौकांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढून यात्रेचे स्वागत करण्यात आले. अशोक वाटिका येथील उड्डाणपुलावरुन पुष्पवृष्टी करण्यात आली. नागरिकांनी देशहितासाठी 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले. स्वागत यात्रेचा समारोप बिर्ला राम मंदिरात सामूहिक रामरक्षा व महाआरतीने झाला.