Trible Protest : इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आले, पूर्ण माना आदिम जमाती आंदोलनात सहभागी होऊन जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकवण्यात आला. शासनाच्या परिपत्रकानुसार जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी दिलेल्या अर्जावर सहा महिन्याच्या आत लाभार्थ्याला वैधता प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. मात्र आज पर्यंत एकूण 176 प्रकरणांपैकी बोटावर मोजण्या इतकेच प्रकरण मार्गी लागले आहेत. त्यामुळे समाजातील गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, नोकरी व शासकीय व्यक्तींना पदोन्नती पासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे त्यांचा मानसिक त्रास वाढत असल्याने परिणामी आयुष्य अधोगतीकडे वळत आहे. याला सर्वस्वी कुचकामी प्रशासन जबाबदार आहे. असे आरोप माना आदिम जमात समन्वय समितीचे कार्याध्यक्ष अरविंद सांदेकर यांनी केले आहे. या समस्येच्या निराकरणासाठी दोन्ही जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहून सदर मोर्चाला भव्य स्वरूप प्रदान केले. अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करण्याचे आव्हान आयोजक अरविंद सांदेकर यांनी केले आहे.
अनेक दिवसांपासून वैधतेची प्रलंबित असलेली प्रकरणे महिनाभरात वैधता प्रमाणपत्र देऊन निकाली काढावीत, गृह चौकशीसाठी पाठविलेली प्रकरणे दक्षता पथकामार्फत प्राधान्याने अहवाल मागवून निकाली काढावे, माना जमातीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी खास शिबिराचे आयोजन करावे, आदिवासींना शासनाकडून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय लाभ घेण्याकरिता जमात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे मागेल त्या आदिवासी बांधवांना विना शिफारस चाैकशीअंती विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र द्यावे.
समित्यांना आवश्यक ती साधन सामुग्री व मनुष्यबळ तत्काळ पुरविण्याची व्यवस्था करावी, शासन तथा न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे अनुपालन जमात तपासणी समित्या काटेकोरपणे करतात की नाही, यावर बारकाईने नियंत्रण ठेवावे आदी मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चाचे नेतृत्व माना आदिम जमात समन्वय समितीचे उपाध्यक्ष डॉ. रमेशकुमार गजबे, कार्याध्यक्ष अरविंद सांदेकर, वामनराव सावसाकडे, सचिव विजयकुमार घरत, जिल्हाध्यक्ष नीतेश धारणे यांनी केले. मोर्चात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते