Buldhana : ज्ञानेश्वर टाले हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. एका जागेच्या जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे जागेच्या जुन्या वादातून दोन गटात मारामारी झाली असून कोयत्याने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत 4 – 5 जण जखमी झाले आहेत. या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हाणामारीत जखमी झालेल्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डोणगाव पोलिस ठाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले, देवेंद्र आखाडे, वैभव आखाडे यांच्यासह पाच जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्ञानेश्वर टाले तसेच ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी, गजानन सातपुते यांच्यात दुकानाचा कब्जा घेण्यावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने तुफान मारामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर घटनेत महिलांना देखील मारहाण झाली आहे. घटनेत ज्ञानेश्वर टाले जखमी झाले आहेत. त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी वरून गजानन सातपुते यांच्यासह सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.