मुंबई : विधान सभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर आभाराचे भाषण देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे कौतुक केलं. “मी शिंदेंना २००४ पासून आमदार म्हणून बघतोय. २००४ पासून २०२२ पर्यंत तुम्हाला असं भाषण करताना मी कधीच पाहिलं नव्हतं,” असे अजित पवारांनी म्हणताच मुख्यमंत्री शिंदेंनी हात जोडून हसून या प्रतिक्रियेला प्रतिसाद दिला.
“आज शिंदेंची गाडी सुसाट सुटली होती. ती बुलेट ट्रेनच होती. ते काही थांबायला तयार नव्हते. फडणवीसांना वाटत होतं की बोलता बोलता असा काही एखादा वेडावाकडा शब्द जाईल याची चिंता होती. वक्ता बोलत जातो, बोलत जातो आणि तो कधी घसरतो काही कळत नाही. तसं काही आपल्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये असं काही होऊ नये याची एवढी काळजी उपमुख्यमंत्र्यांना होती की विचारता सोय नाही”, असे पवार यांनी सभागृहात म्हणताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू अनावर झाले.