District Administration : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली. मंगळवारी (ता. 26) सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर गावात हा भूकंप झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले. भूंकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नाही असे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्यावतीने ही माहिती प्रकाशित करण्यात आली.
प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी 06.27 वाजता अंत्री मलकापूर गावात सौम्य प्रकारचे हादरे जाणवले. रिश्टर स्केलवर हा भूकंप 2.9 इतक्या तीव्रतेचा होता. हा अत्यंत सौम्य भूकंप असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याची नोंद भूकंप मापक यंत्रावर झाली आहे. भूकंपाचे हक्के काही सेकंदापर्यंत जाणवल्याची माहिती भूकंप मापक यंत्रणेकडून देण्यात आली आहे. यापूर्वी जून 2022 मध्ये अकोल्यात 3.5 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. जून 2020 मध्येही अकोला जिल्ह्यात भूकंपाची नोंद झाली होती. त्यावेळी राष्ट्रीय भूकंप मापक केंद्राने 23 जून 2020 रोजी सायंकाळी 05.28 वाजता भूकंपाची नोंद केली होती. 17 एप्रिल 2021 मध्येही अकोल्यात भूकंपाची नोंद आहे. यावेळीही एप्रिल महिन्यातच भूकंपाची नोंद झाल्याचे राष्ट्रीय भूकंप मापक यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.
असा होता भूकंप
राष्ट्रीय भूकंप मापक यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार अंत्री मलकापूरला जाणवलेल्या भूकंपाची खोली 10 किलोमीटर जमीनीच्या आतपर्यंत होती. अकोल्यासह मध्य प्रदेशातील इंदौर, पंचमढी, नागपूर, तेलंगणातील निजामाबाद येथेही या भूकंपाची तीव्रता जाणवली आहे. नागपूर येथेही या भूकंपाची नोंद झाली आहे. नागपूरला 2.8 तीव्रतेचे दोन धक्के जावणले आहेत.
एकाच दिवशी चार धक्के
देशभरात मंगळवारी (ता. 26) भूकंपाचे चार धक्के जाणवले आहेत. यातील एक अकोला जिल्ह्यात, दोन नागपूर येथे एक धक्का मेघालयात जाणवला आहे. मेघालयातील भूकंपाची तीव्रता 3.2 होती. पर्वतीय भागांमध्ये हा सौम्य धक्का जाणवला आहे. दुपारी 02.53 वाजताच्या सुमारास सर्वांत प्रथम नागपूरला भूकंपाची नाेंद झाली. त्याच्या दोन मिनिटांनंतर म्हणजेच दुपारी 02.55 वाजता मेघालयात भूकंप झाला. त्यानंतर पुन्हा नागपूरला दुपारी 03.02 वाजता दुसरा धक्का जाणवला. त्यांनतर सायंकाळी 06.18 वाजता अकोला जिल्ह्यातील जमीन भूकंपाच्या धक्क्याने हादरली.