Kalamb : मद्यपान करून तरुणांना रस्त्यावर धुडगुस घालताना आपण नेहमीच बघतो. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे मद्यधुंद तीन युवतींनी अश्लील शिविगाळ करीत दोन युवकांना भररस्त्यात मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीच्या या घटनेमुळे बसस्थानक परिसरात पाऊणतास वाहतूक ठप्प झाली होती. समाज माध्यमांवर या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कळंब पोलिसांनी यावर कारवाई केली.
1 मार्च शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील बसस्थानक परिसरात मद्यधुंद अवस्थेत शिल्पा, शितल व अजून एक अल्पवयीन मुलगी अशा तिघींनी दादागिरी करत दोन युवकांना भररस्त्यात विनाकारण बेदम मारहाण केली. त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक पाऊणतास ठप्प झाली होती. काही लोकांनी हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला असता, ‘कोई बीच में नही आएगा, एखादे कु टपका देंगे’असे म्हणत युवतींना त्यांना थांबवायला आलेल्या लोकांना धमकाविले व दोन्ही युवकांना बेदम मारहाण सुरूच ठेवली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांतून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तीनही युवती यवतमाळ येथून ऑटोरिक्षाने कळंब येथे आल्या होत्या. मद्यप्राशन करून धिंगाणा घातल्यानंतर त्या तिघी आलेल्या ऑटोरिक्षातून यवतमाळच्या दिशेने रवाना झाल्या. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाला जाग आली. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत राडा घालणाऱ्या शिल्पा, शीतल व एका अल्पवयीन मुलीला यवतमाळ येथून ताब्यात घेत चौकशीसाठी कळंब पोलिस ठाण्यात आणले. ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी तिनही युवतींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र,तरुणींनी केलेल्या मारहाणीची चर्चा संपूर्ण कळंब शहरात आहे.