Home » भविष्यातील बदलते युद्ध चित्र : शस्त्र नव्हे सायबर अस्त्र

भविष्यातील बदलते युद्ध चित्र : शस्त्र नव्हे सायबर अस्त्र

by नवस्वराज
0 comment

युद्ध कोणालाच नको असते. स्वत:चे संरक्षण करण्यासाठी युद्ध करावे लागणे समजू शकतो; पण सत्तेच्या लोभासाठी युद्ध म्हणजे सर्वनाशाचे कारणच. एकविसाव्या शतकातील प्रत्येक युद्धामध्ये ‘सायबर वॉर’हा एक अविभाज्य भाग झाला आहे.

– डॉ. विशाल लिचडे

‘सायबर वॉर’ म्हणजे एक प्रकारचे अघोषित युद्ध. प्रत्येक देश यासाठी स्वत:ची ‘सायबर फोर्स’ वाढवायच्या मागे सध्या लागले आहेत. इतिहास शिकण्यासोबतच भविष्यासाठी तयारी अधिक जास्त महत्वाची आहे. माझा युद्धासोबत काहीच संबंध नाही. मला काय फरक पडणार आहे? असा विचार जर कोणी करत असेल, तर तो तंत्रज्ञानापासून सध्यातरी खूप दूर आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण इंटरनेट वापरणारा प्रत्येकजण ‘सायबर वॉर’ सोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जोडला गेलेला आहे.

आपण वापरात असलेली ‘कॉम्प्युटर सिस्टिम’चे सायबर ऑडिट झाले आहे का आणि झाले असेल तर मागील ऑडीटनंतर त्यात काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल किंवा अपडेट केले असेल तर त्याचे सुद्धा ऑडिट करणे गरजेचे आहे. बँकेचे किंवा इतर आर्थिक ऑडिट आपण वर्षातून एकदा करत असलो तरी सायबर ऑडिट वर्षातून किमान दोन ते तीन वेळा करणे आवश्यक आहे. आजच्या युगातील ती गरज आहे. यासाठी भारतात ‘आयझॅक फाऊडेशन’ (Information Sharing and Analysis Center) ही संस्था सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट तयार करण्याचे काम २०१२ पासून करीत आहे. या सर्व सायबर सिक्युरिटी एक्स्पर्टची माहिती ‘आयझॅक फाऊंडेशन’ मार्फत नॅशनल सिक्युरिटी डाटाबेस (एनएसडी) मध्ये उपलब्ध आहे.

भारत सरकारच्या तांत्रिक शिक्षण आणि सायबर सुरक्षा क्षेत्रामधील तीन शिखर संस्था एआसीटीई, सीईआरटी आणि एनसीआयआयपीसी. यांच्या सहकार्याने कार्यरत आयझॅक फाऊंडेशन ही संस्था एनएसडीमधील माहिती ईतर शासकीय आणि खासगी संस्थांना आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देते. आता प्रश्न उरतो तो भारत देशात संपूर्ण सायबर सिक्युरिटी ऑडीट करणे शक्य आहे काय? तर उत्तर आहे सध्यातरी नाही. कारण नास्कॉम (The National Association of Software and Service Companies) नुसार भारतात किमान पाच लाख सायबर सिक्युरिटी एक्स्पर्टची गरज आजघडीला आहे. या तुलनेत आपल्याकडे सध्या ५० हजार सुद्धा सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट नाहीत. त्यामुळे सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भविष्यात प्रचंड मागणी राहणार आहे.

प्रत्येकालाच सायबर सिक्युरिटी बद्दल शिक्षण ही आता येणाऱ्या काळाची गरज बनत जाणार आहे. ज्या ज्या तंत्रज्ञानामध्ये ‘स्मार्ट’ असा उल्लेख येतो, उदाहरणार्थ स्मार्टफोन, स्मार्ट मायक्रोवेव्ह, स्मार्ट वॉच, स्मार्ट सिग्नल, स्मार्ट टीव्ही अशा प्रत्येक ठिकाणी सायबर हल्ल्यांची भीती राहणार आहे. देशभरात प्रत्येक व्यक्ती सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट होऊ शकत नसला तरी स्वत: वापरत असलेले मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, घरातील ईतर स्मार्ट उपकरणे, बँकेच्या व्यवहारात वापरणात येणारे एटीएम, कार्ड, नेट बँकिंग अकाऊंट यावर सुद्धा कोणी सायबर हल्ला करणार नाही यासाठी सजग राहणे दिवसेंदिवस गरजेचे होत जाणार आहे. याबद्दल प्रत्येकाला खबरदारी घेता येण्यापुरते शिक्षण नसणे ही मोठी शोकांतिका आहे. तंत्रज्ञानाने जीवनाचा एक मोठा भाग भौतिक अवकाशातून सायबर स्पेसमध्ये हलविला गेला आहे. सायबर स्पेस व्हर्च्युअल असली तरी त्यातून निर्माण होणारे धोके आभासी नसतात. त्यामुळे आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात मोठा व्यत्यय येतो.

भविष्यात सायबर सैनिक बनविण्यासाठी विविध देश कामाला लागणार आहे. काही देश कामाला लागलेही आहे. त्यामुळे आगामी काळातील चकमकी किंवा युद्ध आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय), एमएल अशा स्वरुपात राहतील. स्वयंचलिक उपकरणे हॅकिंगचे प्रमाण वाढत जाईल. सायबर धोका खूप वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे भविष्यातील या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सायबर साक्षरता महत्वाची ठरणार आहे. भारतात आजघडीला सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या विविध सरकारी व खासगी कंपन्यांमध्ये पाच लाखांवर नोकऱ्या उपलब्ध आहेत. केवळ ऑनलाइन वस्तुनिष्ठ आधारित परीक्षा उत्तीर्ण करून ‘इथिकल हॅकर्स’ बनलेल्या लोकांवर यापुढे कोणतीही संस्था यापुढे विश्वास ठेवणार नाही, तर त्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान आणि योग्य पदवीही लागले. त्यामुळे भविष्यातील या संधीचे युवकांनी आतापासूनच सोने करणे गरजेचे आहे.


(लेखक राष्ट्रीयस्तरावरील इथिकल हॅकिंग आणि सायबर सुरक्षा विषयक तज्ज्ञ असून प्रशिक्षणही देतात.)
error: Content is protected !!