अकोला : शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, याकरिता अकोला पोलिसांकडून विविध उपाय करण्यात येत आहेत. याच उपायांचा एक भाग म्हणून अकोला शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑटो चालकांची बैठक जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयात घेण्यात आली.
दुधगावकर यांनी अकोला शहरातील सर्व ऑटो चालकांना वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, अशी सूचना केली. ऑटो चालवताना गणवेश, बॅच-बिल्ला याचा वापर करावा, ऑटो चालविताना सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी, शहरातील प्रमुख चौकातील सिग्नलच्या नियमांचे पालन करावे, नियमानुसार ऑटो हा दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच उभा करावा, ऑटो चालकांनी ऑटो चालविताना वाहनासंदर्भात संपूर्ण कागदपत्र सोबत ठेवावे, अशा सूचना दिल्या.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ यांच्यासह शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी, अकोला शहरातील ऑटो चालक 200 मालक-चालक बैठकीला होते. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक विलास पाटील म्हणाले ऑटो चालकांनी आपला खाकी गणवेश परिधान करावा, बॅच-बिल्ला त्यावर लावावा, लायसेन्स आणि वाहनाची मूळ कागदपत्रे सोबत ठेवावी, अवैध प्रवासी वाहतूक करू नये, ऑटोच्या इंधनात भेसळ करू नये, सीएनजी गॅस भरताना अधिकृत डीलर कडूनच गॅस भरावा, ग्राहकांकडून जास्त प्रवासी भाडे वसूल करू नये, दिलेल्या पार्किंग स्थळीच ऑटो पार्क करावेत, प्रवासी मिळवण्यासाठी बस स्टॅन्ड , रेल्वे स्टेशन मध्ये जावून आरडाओरड करू नये, ऑटोमध्ये काही वस्तू राहिल्यास पोलिसांकडे जमा कराव्या, संशयित व्यक्ती, वस्तू घटनेबद्दल पोलिसांना माहिती द्यावी.